![Image](http://kitintellect.tech/wp-content/uploads/2024/03/unnamed-2-1.png)
क्रीडा प्रचार व प्रसारासाठी प्रोत्साहनात्मक अनुदान योजना
१. महाराष्ट्र क्रीडा परिषद अनुदान योजना
महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून संचालनालयाने मान्यता दिलेल्या क्रीडा मंडळे/ संघटना/स्थानिक स्तरावरील संस्था/जिल्हा क्रीडा परिषदांना निर्वाह, क्रीडा साहित्य खरेदी, अधिकृत राज्य/ राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन व क्रीडांगण देखभाल दुरुस्ती याबाबींकरिता अनुदान दिले जाते.
स्थानिक स्तरावरच्या संघटना/मंडळे/संस्था यांना दरवर्षी निर्वाह अनुदानापोटी कमाल रूपये- ५००/- व क्रीडा साहित्याकरिता कमाल रूपये- २०००/- तर जिल्हा क्रीडा परिषदा/जिल्हा संघटनांना दरवर्षी निर्वाह अनुदानापोटी कमाल रूपये- ५०००/- व क्रीडा साहित्यासाठी रू.५०००/- या दराने तसेच राज्य संघटनांना निर्वाह अनुदान हे संलग्न जिल्हयांमागे रूपये- १०००/- अथवा ग्राहय बाबींवरील गतवर्षीच्या प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल इतके अनुदान या दराने व साहित्य अनुदान कमाल रूपये- ५०००/- या दराने अनुदान देण्यात येते.
अधिकृत राज्यस्तरीय स्पर्धांसाठी कमाल रूपये- १.०० लाख किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के यापैकी कमीत कमी असेल इतके अनुदान देण्यात येते व अधिकृत राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनासाठी कमाल रूपये-२.०० लाख किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के यापैकी कमी असेल इतके अनुदान दिले जाते.
२. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविणा-या माध्यमिक शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान :
शालेय खेळ महासंघाद्वारे पुरस्कृत स्पर्धा तालुका स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यन्त दरवर्षी आयोजित करण्यात येतात. शालेय विद्याथ्र्यांच्या अंगी क्रीडागुण असणा-या शालेय विद्याथ्र्यांना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी या स्पर्धेचा फार चांगला उपयोग होतो. अनेक शाळा अशा स्पर्धांमधून दरवर्षी सहभागी होऊन उज्ज्वल यशही संपादन करतात. सध्या अशा माध्यमिक शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याची योजना कार्यान्वित आहे, या योजनेबाबत राज्यांच्या क्रीडा धोरणानुसार दिनांक ३१ जुलै १९९७ च्या शासन नियमानुसार त्यातील नियम सुलभ करण्यात आले आहे, त्यानुसार प्रोत्साहनात्मक अनुदान रूपये- १०,०००/- ऐवजी रूपये- १५,०००/- करण्यात आले आहे.
● क्रीडांगणाची देखभाल व दुरुस्ती.
● क्रीडा साहित्याची खरेदी.
● क्रीडा वाड:मय पुस्तके, नियतकालिके यांची खरेदी
● क्रीडाविषयक ध्वनिचित्रफितीची खरेदी
● प्रशिक्षकाचे मानधन.
विविध खेळांच्या संघटनांना अधिक बळकटी देण्याच्यादृष्टीने क्रीडा धोरणानुसार खेळांच्या राज्य संघटना/संस्था मंडळ यांना स्पर्धांचे आयोजन राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग व प्रशिक्षण शिबीरे व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणा-या खेळाडूंना आर्थिक सहाय्य अशा विविध योजनात सुधारणा करुन पूर्वी देण्यात येणा-या अनुदान रक्कमेत वाढ करण्यात आली आहे.
३. जलतरण तलाव बांधकाम योजना :
सदरहू योजना राज्यस्तरीय योजना असून या योजनेअंतर्गत संस्थांना ५० x २१ मीटर व २५ x २१ मीटर आकाराचा जलतरण तलाव बांधण्यासाठी अनुक्रमे रु. २१.०० लाख व रूपये- १०.०० लाख या दराने अनुदान देण्यात येते.
वरील सर्व योजना संचालनालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व जिल्हा क्रीडा कार्यालयांकडून यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत.
४. कुस्ती, ज्युदो, कराटे व अदयावत व्यायामशाळा विकास अनुदान :
प्रस्तुतच्या योजनेअंतर्गत पंजीबध्द संस्थांना अत्याधुनिक व्यायाम साहित्य तसेच कुस्ती, ज्युदो, कराटे यासाठी अदयावत मॅट, जिम्नॅस्टिक, अॅथलेटिक्स, वेटलिफिटंग व अॅक्वेटिक्स खेळाचे अदययावत साहित्य घेण्यासाठी संस्थेचा २५ टक्के हिस्सा, अधिक शासनाचे ७५ टक्के इतक्या रक्कमेचे साहित्य खरेदी करुन देण्यात येते.
५. अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंना आर्थिक सहाय्य :
राज्यातील खेळांडूना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने प्रत्यक्ष विमान भाडयाच्या ५० टक्के आर्थिक सहाय्य देण्याची योजना सध्या कार्यान्वित आहे. अशा आंतररष्ट्रीय स्पर्धेत प्रत्यक्ष भाग घेण्यासाठी विमान प्रवासाशिवाय किट चार्जेस, स्पर्धा प्रवेश शुल्क तसेच निवास व भोजन खर्चापोटी सुध्दा संबंधित खेळाडूना काही वेळा स्वत: खर्च करावा लागतो. त्यामुळे उत्कृष्ट खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यापासून वंचित रहावे लागते. विमान प्रवासापोटी झालेल्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना केंद्र शासनमार्फत राबविली जाते. त्यामुळे सदर द्विरुक्ती टाळण्यासाठी क्रीडा धोरणानुसार दि. ३१.०७.१९९७ च्या शासन निर्णयानुसार सदर योजनेत सुधारणा करुन परदेशी प्रवासासाठी विमान भाडयाच्या ५० टक्के आर्थिक सहाय्य मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. जर सदरहू खर्च केंद्र शासन किंवा संबधित संघटनेने केला असल्यास त्याऐवजी किट, चार्जेस, प्रवेश शुल्क, निवास व भोजन खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रु. २०,०००/- आर्थिक सहाय्य प्रतिपूर्तीपोटी देण्याचा निर्णय घेतला आहे.
६. राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यासाठी अधिकृत राज्यसंघांना आर्थिक सहाय्य.
या योजनेअंतर्गत राज्यातील मान्यताप्राप्त एकविध खेळ, राज्यसंघटनांना राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यासाठी ,किमान ७ दिवसाच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यासाठी अनुदान दिले जाते.
७. अधिकृत राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत राज्याचे संघ सहभागी होण्यासाठी राज्य क्रीडा संघटनांना आर्थिक सहाय्य.
महाराष्ट्रातील गुणवान खेळाडूंना विविध खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणे सुलभ व्हावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने सदरहू योजना राबविण्यात येते, या योजनेअंतर्गत दि. ३१.०७.१९९७ च्या शासन निर्णयान्वये १) प्रवासखर्च, २) हातखर्ची भत्ता ३) स्पोर्टस् किट, ४) ट्रॅकसूट इत्यादी करिता दयावयाच्या दरात वाढ करण्यात आली.
८. एकविध खेळाच्या राज्यसंघटनांना प्रोत्साहनात्मक अनुदान
भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या मान्यताप्राप्त खेळाच्या एकविध राष्ट्रीय महासंघामार्फत आयोजित वरिष्ठ गटाच्या अधिकृत राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पदके प्राप्त करणा-या एकविध राज्य क्रीडा संघटनांना सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक प्राप्त केल्यास प्रोत्साहन अनुदान मंजूर करण्यात येते.
९. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या खेळाडूंना ट्रॅकसूट व गणवेश देणे.
भारतीय शालेय क्रीडा महामंडळ यांच्यामार्फत आयोजित केल्या जाणा-या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणा-या खेळाडूंना ट्रॅकसूट व गणवेश पुरविण्यात येतो.